सिंह आणि उंदीर

उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो  उंदीर सिंहला  खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले. 

पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.

तात्पर्य:- जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *