एका माणसाच्या घरी एक खुप सुंदर दिवा होता. अगदी सुबक, रेखीव नक्षीकाम केलेला, चमकदार.
तो माणुस त्या दिव्याला नेहमी लख्ख पुसुन ठेवायचा. रोज तेल घालुन नवी वात लावायचा. त्यामुळे त्या दिव्याचा पूर्ण खोलीत छान प्रकाश पसरायचा. त्या माणसाकडे येणारे लोक नेहमी त्या दिव्याचं कौतुक करायचे.
“किती सुंदर दिवा आहे”
“काय छान प्रकाश पडलाय”
“या दिव्यामुळे घर किती उजळुन निघालंय”
अशी स्तुती ऐकुन ऐकुन त्या दिव्याला गर्व झाला. आपल्या इतका सुंदर प्रकाश कोणीच देत नाही असं त्याला वाटायला लागलं.
तो माणसाला म्हणाला, “अरे लोक माझं इतकं कौतुक करतात, मला खोलीतच का ठेवलंय? मला बाहेर घेऊन चल, पहा मी सूर्यापेक्षा छान प्रकाश देतो कि नाही. सगळे माझं अजुन कौतुक करतील.”
माणुस दिव्याला घेऊन घराबाहेर गेला. तेवढ्यात एक वाऱ्याची झुळूक आली आणि दिवा विझुन गेला.
सूर्य मात्र आकाशात नेहमीसारखाच तळपत होता.