एकदा एका जंगलात, नदीच्या काठावर असलेल्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होते. त्याच जंगलात एक मगर आणि त्याची बायको राहत होती. एके दिवशी मगर नदीच्या काठावर येऊन झाडाखाली विसावला. दयाळू माकडाने त्याला काही जांभळे दिली. मगर दुसऱ्या दिवशी आणखी जांभळांसाठी परत आला, कारण त्याला जांभळे आवडत होती. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मगर आणि माकड चांगले मित्र बनले.
एके दिवशी माकडाने मगरीच्या पत्नीसाठी काही फळे पाठवली. तिने जांभळे खाल्ली आणि तिला ती आवडली, पण तिला मत्सर वाटत होता, कारण तिला तिच्या नवऱ्याने माकडासोबत वेळ घालवणे आवडलेले नव्हते. तिने आपल्या पतीला सांगितले, “जर फळे इतकी रसाळ असतील तर माकडाचे हृदय किती गोड असेल. मला माकडाचे हृदय मिळवून दे.” मगरीला आपल्या मित्राला मारायचे नव्हते, पण पर्याय नव्हता.
त्याने माकडाला त्याच्या घरी जेवायला बोलावले आणि त्याच्या पत्नीला त्याला भेटायचे आहे असे सांगतिले. माकड आनंदी होते, पण पोहता येत नव्हते म्हणून मगरीने त्याला पाठीवर घेतले. आपण माकडाला फसवल्याचा आनंद मगरीला झाला, मात्र, बोलताना त्याने माकडाला घरी नेण्याचे खरे कारण सांगून टाकले. हुशार माकड म्हणाले, “तुम्ही मला आधी सांगायला हवे होते, मी माझे हृदय झाडावरच ठेवले आहे. आपण परत जाऊन ते घेऊन आले पाहिजे.” मगरीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि माकडाला पुन्हा झाडाकडे नेले. त्यामुळे हुशार माकडाचा जीव वाचला.
बोध: मित्रमैत्रिणी निवडताना काळजी घ्या आणि प्रसंगावधान राखा.