रामपूर मंदिरात एक चोर मंदिरातील काही गोष्टी चोरतो. पकडल्या जाण्याच्या भीतीने तो पळू लागतो. खूप दिवस प्रवास केल्यानंतर तो एका मोठया डोंगरावर जातो. डोंगराच्या शिखरावर गेल्यावर आराम करण्यासाठी तो थोडया वेळ तेथे बसतो. अचानक तिथे एक सिंह येतो. त्या चोराला बघून तो सिंह त्याच्याकडे झेप घेतो, व त्याला मारून टाकतो. त्या झटापटीमध्ये चोराची पिशवी उघडली जाते व त्यातील वस्तु अस्ताव्यस्त जमीनीवर पसरल्या जातात. त्या चोरीच्या वस्तुंमध्ये मंदिरातील घंटाही होती.
माकडांचा एक झुंड तेथून जात होता, तेव्हा त्यांनी ती घंटा बघितली. ते ती घंटा उचलतात आणि वाजवायला सुरूवात करतात, त्यांना तो आवाज आवडतो. त्यामुळे ते ती घंटा वाजवतात व त्याबरोबर ते खेळतात.
डोंगराच्या पायथ्याशी एक छोटे डोंबिवली गांव होते. त्या गावातील लोक अतिशय साधी होती. त्यांची एक विचित्र समजूत होती. डोंगरावरून येणाऱ्या घंटीच्या आवाजामुळे सर्व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते व त्या डोंगरावर एक राक्षस रहात आहे, तो राक्षस ती घंटी वाजवून आपण येण्याची सूचना देत आहे अशी बातमी गावकऱ्यांमध्ये पसरली.
त्यांना खात्री झाली की जो कोणी डोंगरावर जाईल त्याचा तो राक्षस बळी घेईल. अशा प्रकारच्या अनेक अफवा त्या गावात पसरल्या होत्या. अंधार झाल्यावर लोंकानी त्यांच्या घराबाहेर जाणे बंद केले होते. अगदी दिवसासुध्दा जेव्हा ते घंटीचा आवाज ऐकत असत तेव्हा त्यांचा भीतीने थरकाप होत असे. त्या सर्वांमध्ये एक शूर राम नावाचा मुलगा होता. तो राक्षस व भूतांना घाबरत नव्हता, त्याचा असा विश्वास होता की प्रत्येक गोष्ट घडण्यामागे कारण असते. तो गावातील बाकीच्या लोकांवर हसत असे. तो त्यांना सांगत असे की, कदाचित काही माकडांना घंटी सापडली असेल व ते त्या बरोबर खेळत असतील. परंतु त्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हते.
एक दिवस एक सरदार गावातील सर्वांना एकत्र बोलवतो व सांगतो की, ‘जो कोणी त्या राक्षसाचा पाठलाग करून त्याला हाकलून लावेल त्याला बक्षिस देण्यात येईल.’ तो धाडसी राम समोर आला व बोलला मी हे कार्य करीन.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो बहादूर राम पेरूनी भरलेली थैली घेऊन डोंगरावर जायला निघाला. सर्वजण त्याच्याकडे बघत होते आणि विचार करत होते की हा परत कधीही येणार नाही. प्रत्येकजण त्या रामबद्दल अशुभ बोलत होते.
डोंगराच्या शिखरावर पोचल्यावर घंटीचा आवाज येणाऱ्या दिशेकडे तो गेला. काही अंतर चालून गेल्यावर त्याने बघितले की, काही माकडे घंटी बरोबर खेळत आहेत. ते घंटी खेळण्यात इतके मग्न होते की तो राम आल्याचे त्यांना समजले नाही. तो तेथे उभा राहीला व विचार करू लागला, ‘तर हाच तो राक्षस आहे का? आता जर गावकऱ्यानी माकडांना बघितले तर त्यांना स्वतःची लाज वाटेल.’
तो माकडांपासून घंटी परत घेण्याचा विचार करू लागला. त्याने थैलीतून पेरू काढले. आणि काही पेरू जमीनीवर फेकले. माकडांनी पेरू बघितले आणि ते घंटीबद्दल सर्व विसरून गेले. त्यानंतर त्यानी घंटी तिथेच फेकून दिली व पेरू खायला सुरूवात केली.
त्या हुशार मुलाने ती घंटी उचलली, आणि तो डोंबिवली गावाकडे परत आला. त्याला गावामध्ये आलेला बघून सर्व गावकरी चकित झाले. तो गावातील सरदाराला भेटतो व बोलतो, मी त्या राक्षसाला पळवून लावले आहे त्याचा पुरावा म्हणून मी घंटी घेऊन आलो आहे.’ व तो ती घंटा सरदाराकडे देतो. सर्वांना त्याचा अभिमान वाटतो.
‘आता मी तुम्हाला खरे काय सांगतो, घंटा ही काही माकडांकडे होती. मी एक युक्ती केली, माकडांकडे काही पेरू फेकले व त्यांच्याकडून घंटी घेऊन आलो. व आता शेवटी तुमच्या सर्वांच्या हे लक्षात आले पाहिजे की, भूत किंवा राक्षस यासारखे काही नसते कोणाच्याही सांगितलेल्या गोष्टींवर स्वतः बघितल्या शिवाय विश्वास ठेवू नये.’
सर्वजण त्याच्याशी सहमत झाले. सर्वांना स्वतःची लाज वाटली त्या सर्वांनी त्याला आश्वासन दिले की, यापुढे भविष्यात मूर्खासारखे वागणार नाही. गावातील सरदाराने त्या बहाद्दूर रामला सांगितल्याप्रमाणे बक्षिस दिले.
तात्पर्य - कोणाच्याही सांगितलेल्या गोष्टींवर आपण स्वतः बघितल्याशिवाय विश्वास ठेवू नये.